ब्राह्मण सभेतर्फे परशुराम पुरस्कार आणि कोजागिरी सोत्साहात

← सर्व उपक्रम

मुख्य बातमी:
अमरावती दि. २६ : कोजागिरी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला शनिवार दिनांक २४ रोजी ब्राह्मण सभेमध्ये परशुराम पुरस्कार आणि विविध पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ज्या व्यक्तींनी आजन्म भिक्षुकी केली, अशा ६० वर्षांवरील दोन गुरुजींचा परशुराम पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्कारासाठी काही दानदात्यांनी रक्कम दिलेली आहे. काही विद्यार्थ्यांनी, महिलांनी, पुरुषांनी विविध क्षेत्रांमध्ये राज्य किंवा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केलेल्या अशा व्यक्तींचाही सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात मंचावर ब्राह्मण सभेचे अध्यक्ष आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मोहन काटे सर, तर प्रमुख पाहुणे म्हणून होमिओपॅथी डॉक्टर प्रशांत पाठक आणि सचिव मनीषा मराठे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन उत्कृष्टपणे अनुजा अतुल सोहोनी यांनी केले.
प्रथम सरस्वती पूजन करण्यात आले. यावेळी श्रीयुत चंद्रशेखर जोशी व श्रीयुत रमेश जोशी गुरुजींनी स्वस्तिवचन म्हटले. मंचावरील पाहुण्यांचा गुलाबपुष्प, फळांची परडी आणि शाल देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक मनीषा मराठे यांनी केले. विविध क्षेत्रांमध्ये गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या व सेवा देणाऱ्या एकूण १७ व्यक्तींचा गुलाबपुष्प, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत पाठक यांनी स्वतःच्या अनुभवावरून लिहिलेल्या ‘पप्पूच्या पुढ्या’ या पुस्तकातील दोन अनुभव कथन केले. ते ऐकून सभागृहात हशाचा पिक लागला. अध्यक्षीय भाषणात मोहन काटे सरांनी उपस्थितांना कोजागिरीच्या शुभेच्छा देऊन सत्कारमूर्तींचे अभिनंदन केले.

जोशी यांनी ‘पंढरपूरच्या सायकल वारीचा अनुभव’ सत्काराला उत्तर देताना मनोगतातून व्यक्त केला. आनंद महाजन यांनी ब्राह्मण सभेने सन्मान केला म्हणून आभार व्यक्त केले. श्री. गोगरकरांनी आपला वैदिक शैक्षणिक प्रवास सांगितला. साऊथ आफ्रिकेतील डर्बन येथील अतिशय खडतर अशा ९० किमीच्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी झालेले अमरावती जिल्ह्यातून एकमेव स्पर्धक डॉ. धानोडकर असून, सलग दुसऱ्यांदा कशी जिंकली, ते आपल्या मनोगतात व्यक्त करून आभार मानले.
उज्वला कुलकर्णी यांनी ब्राह्मण सभेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे आणि तिला ब्राह्मण सभेने आपलंसं केलं, याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शर्मिष्ठा कुलकर्णी यांनी केले. गायत्री खरे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर सगळ्यांनी अल्पोपहार आणि दुग्धपान हा कोजागिरीचा प्रसाद घेतला आणि आनंदाने कार्यक्रमाची सांगता झाली.